DNA मराठी

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक 2025 : जागावाटपावरून महायुतीत तणाव, शिवसेना शिंदे गट वेगळा जाण्याची शक्यता

अहिल्यानगर मनपा निवडणूक महायुती अडचणीत, शिवसेना शिंदे गट वेगळी चूल मांडणार

अहिल्यानगर मनपा निवडणूक : महायुती अडचणीत, शिवसेना शिंदे गट वेगळी चूल मांडणार?

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत महायुती होण्याची शक्यता सध्या धूसर होताना दिसत आहे. जागावाटपावरून सुरू असलेले मतभेद टोकाला पोहोचल्याने शिवसेना शिंदे गट स्वतंत्रपणे, म्हणजेच वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

काल रात्री उशिरापर्यंत महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक सुरू होती. मात्र या बैठकीतही जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेषतः शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच भाजप यांच्यातील चर्चा फिस्कटल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेना शिंदे गट आपल्या विद्यमान नगरसेवकांच्या जागांवर ठाम असून, त्या जागा सोडण्यास स्पष्ट नकार देत असल्यानेच वाद अधिक चिघळल्याचे समजते. दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादीकडून नव्याने समतोल जागावाटपाची भूमिका मांडण्यात आली आहे.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आज संध्याकाळपर्यंत आपली अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, महायुती टिकणार की तुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *