Ahilyanagar District Bank Election : दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि. (अहिल्यानगर) च्या आगामी पंचवार्षिक (सन २०२६-२०३१) निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, विविध मतदारसंघांतून तब्बल १० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी या संदर्भातील अधिकृत माहिती नोटीस बोर्डाद्वारे प्रसिद्ध केली आहे.
या निवडणुकीत जिल्ह्यातील प्रमुख राजकीय घराण्यांतील दिग्गज आणि तरुण चेहऱ्यांनी बाजी मारली आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच इतर संस्था मतदारसंघातून खालीलप्रमाणे बिनविरोध निवडी झाल्या आहेत:
राहाता तालुका: माजी खासदार डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील
नेवासा तालुका: माजी मंत्री शंकरराव यशवंतराव गडाख
कोपरगाव तालुका: बिपिनदादा शंकरराव कोल्हे
पाथर्डी तालुका: आमदार मोनिका राजीव राजळे
अहिल्यानगर तालुका: अक्षय शिवाजीराव कर्डिले
श्रीरामपूर तालुका: करण जयंतराव ससाणे
जामखेड तालुका: सचिन नवनाथ घुमरे
संगमनेर तालुका: रणजितसिंह विजयसिंह देशमुख
शेवगाव तालुका: राजश्री चंद्रशेखर घुले
बिगरशेती संस्था मतदार संघ: सचिन अरुण जगताप
नगर जिल्ह्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची मानली जाणाऱ्या या बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी ताकद लावली होती. मात्र, अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर आणि छाननीअंती प्रमुख इच्छुकांनी बिनविरोध निवडीवर भर दिल्याने १० जागांवर बिनविरोध विजय निश्चित झाला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्या स्वाक्षरीने २२ ऑक्टोबर २०२६ रोजी ही अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. आता उर्वरित मतदारसंघांमधील लढतींचे चित्र स्पष्ट होणार असून, जिल्हा बँकेच्या उर्वरित जागांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






