Woman’s Rights: काही महिला कायद्याचा गैरवापर करत आहेत. कुटुंबातील वादविवाद वकील आणि पोलिसांपर्यंत पोहोचणे योग्य नाही, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले. बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत बोलताना त्यांनी सरकारने महिलांच्या बाबतीत अधिक संवेदनशील होण्याची गरजही व्यक्त केली.
भोपाल येथे जनसुनावणीसाठी आलेल्या रहाटकर यांनी सांगितले की, महिलांवर होणाऱ्या हिंसा आणि अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी कायदे बनवले गेले आहेत. मात्र, काही महिला या कायद्यांचा चुकीचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे.
महिलांवर हिंसा आणि अत्याचार थांबवण्यासाठी हे कायदे तयार करण्यात आले आहेत, पण जर या कायद्यांमुळे पुरुषांवर अन्याय होत असेल, तर ते चुकीचे आहे. काही महिलांच्या चुकीच्या वागण्यामुळे महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या कायद्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.
तसेच त्यांनी बेंगळुरूमधील इंजिनिअर अतुल सुभाष प्रकरणावर देखील भाष्य केले. या वेळी त्या म्हणाल्या की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना घडू नयेत. समाजात घडणाऱ्या घटनांकडे पाहताना असे वाटते की कुठेतरी काहीतरी कमी किंवा चूक आहे. महिलांच्या हिंसा व अत्याचारापासून रक्षणासाठी जे कायदे बनवले गेले आहेत, त्यांचा काही महिला चुकीचा वापर करत असल्याचे दिसते. हे मान्य होऊ शकत नाही. हे कायदे महिलांच्या सन्मानासाठी आहेत. मात्र, जर पुरुषांवर अत्याचार होत असेल, तर ते चुकीचे आहे. काही महिलांच्या या वागण्यामुळे देशातील हजारो महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या कायद्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. असे होणे टाळायला हवे.
आम्ही “राष्ट्रीय महिला आयोग तुमच्या दारात” हा उपक्रम सुरू केला आहे. आयोगाकडे देशभरातून तक्रारी येतात. परंतु, गाव-खेड्यांतील महिलांना दिल्लीपर्यंत पोहोचणे अवघड जाते. म्हणून आम्हीच त्यांच्या दारात पोहोचण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय महिला आयोग केंद्राच्या नियमांनुसार कार्य करते, तर राज्य महिला आयोग राज्य सरकारच्या नियमांनुसार कार्य करते. दोघेही आपापल्या स्तरावर काम करत असतात. राष्ट्रीय महिला आयोग महिलांशी संबंधित विषयांवर संशोधन करून त्यांचे अहवाल केंद्र सरकारला सादर करतो, ज्यायोगे नवीन कायदे तयार करण्यात मदत होते. असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या.