Manoj Jarang – मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार अन् आरक्षण मिळवून देणार; मनोज जरांगे पाटील
मुंबई | प्रतिनिधी – Manoj Jarang – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी लढ्याची हाक दिली आहे. येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन उभारले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी जरांगे राज्यभर दौरे करून बैठकांचे आयोजन करत आहेत. मात्र काल नांदेडमध्ये दौऱ्यादरम्यान त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने क्षणभर गोंधळ उडाला होता. माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, “सकाळपासून सलग बैठका सुरू होत्या. घाम आला, चक्कर आली. सतत उपोषण आणि उपाशी राहिल्यामुळे अशक्तपणा वाढला आहे. शरीर झिजले, यात वेदना आहेत. तरीही मी हटणार नाही. समाजाच्या भवितव्यासाठी हा लढा आहे. माझ्या वेदना मी समाजापुढे मांडत नाही.” आपल्या निर्धाराबद्दल बोलताना ते म्हणाले, “मला समाजाची लेकरं मोठी करायची आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार. काहीही झालं तरी २९ तारखेची लढाई मी लढणार आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार. थकलो तरी जाणार, माझ्या शरीराला किंमत नाही. मेलो तरी चालेल, पण मागे हटणार नाही.” २९ ऑगस्टच्या आंदोलनाबाबत ते पुढे म्हणाले, “मी निघालो की सर्व मराठा समाज रस्त्यावर उतरेल. त्या दिवशी कुणीही घरात राहणार नाही. मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल, आतापर्यंतच्या आंदोलनांपेक्षा पाचपट जास्त. कोणीही आडवा आला तरी मराठ्यांच्या ताकदीसमोर टिकू शकणार नाही.” मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसतानाच जरांगे यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. २९ ऑगस्टच्या आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Manoj Jarang – मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार अन् आरक्षण मिळवून देणार; मनोज जरांगे पाटील Read More »

