Nanded News: हदगाव तालुक्यातील डोंगरी आणि आदिवासीबहुल धन्याचीवाडी गावातील 65 वर्षीय किशन सयाजी खोकले हे पत्नीसोबत अत्यंत हलाखीचे जीवन जगतात. दोन मुलं आहेत. मात्र मुलांकडून जगण्याचा कसलाच आधार नाही.
किशन खोकले हे 1976 मध्ये कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा साखर कारखान्यावर मजूरीला होते. त्यांचा उजवा हात मशीनमध्ये जाऊन अपघातामध्ये खांद्यापासून नाहीसा झाला. डाव्या हाताची तीन बोटे तुटल्याने त्यांचे जीवनच अर्थहीन झाले आहे. कारखान्याने त्यांना वॉचमन म्हणून कामावर ठेवले. तेही करता आले नसल्याने खोकलेंना एक हजार रुपये पेन्शन देत घरी पाठवले.
पूर्णतः अपंग आणि उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसलेल्या खोकलेंनी एक हजार रुपये पेन्शन आणि पत्नीच्या मजुरीतून जगण्याचा आधार बनवला. बैंक खात्यात पेन्शन जमा होत होते, परंतु आधारकार्डची सक्तीआली अन् पेन्शन मिळणे बंद झाले.
आधारकार्ड नसल्याने खोकलेचा जगण्याचा ‘आधार’च संपला. हे विशेष ! तामसा येथील आधार केंद्रावर आधारकार्ड निघत नसल्याचे स्पष्ट झाल्याने खोकले शासन दरबारी खेटे मारतात. तहसीलदार हदगाव व जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देऊन आधारकार्ड काढून देण्याची भीक मागतात. परंतु त्यांच्या मदतीला आजपर्यंत कोणीही भीक घातली नाही.
दोन्ही हात निकामी झाल्याने कोणतेही काम करून पोट भरण्याचा मार्ग बंद झाला. शासनाच्या अनेक लाभाच्या योजना आहेत. मात्र त्या योजना अपंग खोकलेसाठी निरर्थक आहेत. त्यामुळे किशन खोकलेचे जीवन म्हणजे ‘आधार’ विना निराधार बनली आहे.
निराधार योजनेसाठी अर्ज केला तर आधारकार्ड मागतात. ‘आधारकार्डा शिवाय शासनाच्या लाभाच्या योजना घेता येत नसल्याने जीवन जगणे असहा झाल्याचे किशन खोकले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.