DNA मराठी

राजकीय

आरोपींना अटक करा अन्यथा संपूर्ण राज्यात आंदोलन, सरकारला इशारा देते प्राजक्त तनपुरेंचे अन्नत्याग उपोषण स्थगित

Prajakt Tanpure : गेल्या महिन्यात राहुरीत महापुरुष पुतळा विटंबनाची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर या प्रकरणात आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं अन्नत्याग उपोषण सुरू होते. या उपोषणाला आता स्थगिती देण्यात आली आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शिष्टाईने हे उपोषण स्थगित करण्यात आलंय. आता आरोपींना लवकरात लवकर अटक न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे. 26 मार्च रोजी राहुरी शहरात दिवसाढवळ्या महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. घटनेला 20 दिवस उलटूनही आरोपीला अटक होत नसल्याने माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. तिसऱ्या दिवशी तनपुरे यांची प्रकृती खालावली आणि वजनही कमी झाल्याने उपोषणस्थळी सलाईन सुरू करण्यात आले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि खासदार निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू सरबत पाजून हे उपोषण स्थगित करण्यात आले. काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही पुतळा विटंबन प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधलाय. अलीकडच्या काळात सातत्याने राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या घटना घडत आहेत. सोलापूरकर, कोरटकर दोन्ही लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कशा पद्धतीने बोलले. हे सर्व सगळं जाणीवपूर्वक चाललं आहे. लोकांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत. राहुरीची घटना याचाच भाग असावी अशीच वाटतेय. फोटो बघितल्यानंतर राहुरीत पुतळा विटंबन कुणी वेड्याने केले असे वाटत नाही, तर जाणीवपूर्व केल्याचे दिसत आहे. सरकारला लाज राहिली नाही अशी अवस्था आहे, अशी घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

आरोपींना अटक करा अन्यथा संपूर्ण राज्यात आंदोलन, सरकारला इशारा देते प्राजक्त तनपुरेंचे अन्नत्याग उपोषण स्थगित Read More »

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे निर्देश

Ram Shinde: पुढील महिन्यात दिनांक 31 मे, 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती येत असून त्यानिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे संपूर्ण देशभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करेल, त्यांचे असामान्य कार्यकर्तृत्व सर्वांपर्यंत पोहचेल अशा श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. आज विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक आणि दूरदृष्यप्रणालीद्वारे नाशिक विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.  श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा, तसेच सर्व संबंधित विभागांची जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे सुशोभीकरण, त्यांनी संदेश दिलेल्या जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन संकल्पनांची जपणूक, चौंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय, महादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोध्दार, निवास व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ, स्थानिक उत्पादने, खाद्यपदार्थ यांची बाजारपेठ या सोयीसुविधांना प्राधान्य देण्यात यावे, असे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आदेशीत केले.  या बैठकीत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना चौंडी येथे होणाऱ्या प्रस्तावित मंत्रीमंडळ बैठक आयोजनासंदर्भात महत्वपूर्ण सूचना दिल्या. अशा प्रकारे ग्रामीण ठिकाणी होणारी ही राज्य मंत्रीमंडळाची पहिलीच बैठक आहे. श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा, तसेच सर्व संबंधित विभागांची जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावी, असेही यावेळी निश्चित करण्यात आले. बैठकीत प्रस्तावित आराखड्याबाबत स्थापत्य विशारद किरण कलमदानी यांनी सादरीकरण केले.

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे निर्देश Read More »

खासदार लंकेंच्या प्रयत्नांना यश, नगरच्या रेल्वेस्थानकासाठी 31 कोटींचा निधी मंजूर

Nilesh Lanke: अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अहिल्यानगर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 31 कोटी रूपयांचा निधी मंजुर केल्याची माहीती नगरचे खासदार नीलेश लंके यांनी दिली. केंद्र शासनाच्या आखत्यारित असलेल्या रेल्वेच्या विविध समस्यांवर खा. नीलेश लंके यांनी संसदेत आवाज उठविल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून अहमदनगर लोकसभा मतदार संघातील रेल्वेसंदर्भातील विकास कामांचा आढावा घेत कार्यवाही केली. त्यानंतर मतदारसंघातील स्थानकांचे सुशोभिकरण, आवष्यक तिथे उड्डाणपुल आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. यासंदर्भात खा. नीलेश लंके यांनी बोलताना सांगितले की सुशोभिकरणाच्या योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला असून ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकाचे आधुनिकिकरण, स्थानिक प्रवाशांच्या गरजा, नगर शहराची संस्कृती तसेच भविष्यकालिन वाहतूकीचा दृष्टीकोनाचाही त्यात विचार करण्यात आला आहे. काय सुविधा मिळणार ? नव्याने प्रशस्त प्रवासी प्रतीक्षायल, स्वच्छ व सुसज्ज स्वच्छतागृहे, लिफट, एस्केलेटर, फुड सुविधा, इंटरनेटसाठी वाय-फाय सुविधा, व्यवसायिकांसाठी बैठक कक्ष, रूफ प्लाझा, प्लॅटफॉर्म व सर्क्युलेटींग क्षेत्राचा पुनर्विकास, सौर उर्जा, पाणी पुनर्वापर, कचरा व्यवस्थापन, स्थानिक कला व सांस्कृतीक मुल्यांची माहीती देणारे डिझाईन्स. लवकरच कामाला सुरूवात होणार नगर हे रेल्वेच्या दृष्टीने महत्वाचे स्टेशन असून रेल्वे स्थानकाच्या विकासामुळे तसेच इतर सुविधांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार असून यापुढील काळातही अत्याधुनिक रेल्वे सुविधा मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. या कामांसाठी आपण सातत्याने रेल्वेमंत्रालयाकडे पाठपुरावा केला असून लवकरच या कामांची अंमलबजावणी युध्दपातळीवर सुरू होईल अशी माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली.

खासदार लंकेंच्या प्रयत्नांना यश, नगरच्या रेल्वेस्थानकासाठी 31 कोटींचा निधी मंजूर Read More »

नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच

Devendra Fadanvis: राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार सदस्यांना देण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या तरतुदींस मान्यता देऊन महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यापुर्वी नगराध्यक्षांना पदावरुन दूर करण्याच्या प्रक्रियेत निवडून आलेल्या सदस्यापैकी पन्नास टक्के सदस्यांच्या सह्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जात असे. त्यानंतर शासनस्तरावर कार्यवाही अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची कार्यवाही केली जात असे. त्याऐवजी आता अध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांना अधिकार दिले जाणार आहेत. त्यानुसार निवडून आलेल्या सदस्य संख्येपैकी दोन तृतीयांश संख्येने सदस्यांच्या सह्यांचा प्रस्ताव पाठवला जाईल. ज्यावर जिल्हाधिकाऱ्यांना दहा दिवसांच्या आता विशेष सभा आयोजित करून मतदानाद्वारे निर्णय घ्यावा लागेल. याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यास तसेच त्यासाठीचा अध्यादेश काढण्यास मान्यता देण्यात आली.

नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोठडीत मृत्यू झाला तर कैद्याच्या वारसांना मिळणार पाच लाख

Maharashtra Government: राज्यातील कारागृहांमध्ये कोठडीत असलेल्या कैद्यांचा मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाल्यास त्याच्या वारसांना राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या सूचनेनुसार भरपाई देण्याच्या धोरणास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने या निर्णयाला मान्यता दिली आहे. या धोरणानुसार कारागृहामध्ये काम करताना झालेल्या अपघातामुळे, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे, कारागृह कर्मचाऱ्यांच्या मारहाणीमुळे किंवा कैद्यांच्या आपापसातील भांडणात मृत्यू झाल्यास आणि संबंधित प्रकरणात प्रशासनाचा निष्काळजीपणा चौकशीतून सिद्ध झाल्यास, कैद्याच्या वारसांना पाच लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. तुरुंगवासातील आत्महत्येच्या प्रकरणात कैद्याच्या वारसांना एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व कारागृहांमध्ये हे धोरण लागू राहणार आहे. कैद्याचा मृत्यू वार्धक्य, दीर्घ आजार, कारागृहातून पलायन करताना अपघातात, जामीनावर असताना, किंवा उपचार नाकारल्याने झाला असल्यास कोणतीही भरपाई देण्यात येणार नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्यास मात्र शासनाच्या विद्यमान धोरणानुसार भरपाई मिळेल. भरपाईसाठी संबंधित कारागृह अधीक्षकांनी प्राथमिक चौकशी, शवविच्छेदन, पंचनामा, वैद्यकीय अहवाल, न्यायालयीन व जिल्हाधिकाऱ्यांचा तपास आदी कागदपत्रांसह अहवाल प्रादेशिक विभाग प्रमुखांकडे सादर करावा लागेल. यानंतर प्रकरणाची सखोल चौकशी करून अंतिम प्रस्ताव अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सादर केला जाईल. त्यांच्या शिफारशींच्यानंतर शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल आणि भरपाई दिली जाईल. मृत्युच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोठडीत मृत्यू झाला तर कैद्याच्या वारसांना मिळणार पाच लाख Read More »

संविधान बदलणार, हर्षवर्धन सपकाळांच्या दाव्याला सुजय विखेंचा उत्तर

Sujay Vikhe: देशात 2034 साली नवीन संविधान लागू करण्याची हालचाल सुरू असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सपकाळ यांच्या या दाव्यावर भाजपसह अनेक पक्षांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर आता या प्रकरणात नगरचे माजी खासदार आणि भाजप नेते सुजय विखे यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया देत काँग्रेसवर सडकून टीका केली. “काँग्रेसच्या सर्व नेत्यांचा विलाज केला पाहिजे. वारंवार पराभव झाल्यामुळे ते निराशेच्या तळाला गेले आहेत. त्यामुळे त्यांची मानसिकता पूर्णपणे बिघडलेली आहे. मला वाटतं, त्यांना मानसिक आरोग्य केंद्रात काही दिवस पाठवायला हवे, म्हणजे ते बरे होतील आणि देशासाठी काहीतरी सकारात्मक करू शकतील,” अशा शब्दांत डॉ. विखे यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. डॉ. विखे पुढे म्हणाले, “संविधानाचा विषय आता फार जुना झाला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार गेल्या दीड वर्षांपासून काम करत आहे. ना कुठल्याही संविधानात बदल झाला आहे, ना संविधानाला कुठलाही धक्का लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही, तो संविधान पृथ्वीच्या अंतापर्यंत अबाधित राहील.” सपकाळ यांच्या विधानामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादळामुळे विरोधी पक्षांनी देखील या विषयावर अधिक माहितीची मागणी करत, सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, भाजपने सपकाळ यांच्या आरोपांना अफवा आणि दिशाभूल करणारे असल्याचे ठामपणे सांगितले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे नवीन संविधानाच्या चर्चेने पुन्हा एकदा रंग घेतला असला, तरी प्रत्यक्षात सरकारने यावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. त्यामुळे यापुढे या विषयावर काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संविधान बदलणार, हर्षवर्धन सपकाळांच्या दाव्याला सुजय विखेंचा उत्तर Read More »

भिक्षेकरू मृत्यू प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू; सुजय विखेंचा लंकेंना प्रत्युत्तर

Maharashtra Politics: अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान चार भिक्षेकरूंचा मृत्यू झाल्याच्या घटनेने मोठा राजकीय वाद निर्माण केला आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खासदार निलेश लंके यांनी या मृत्यूंना ‘बालहट्ट’ जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या मते, काही जणांच्या हट्टापायी या भिक्षेकरूंना आपला जीव गमवावा लागला. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सुजय विखे म्हणाले, “जर खासदार लंके यांना माझ्याविषयी राग असेल, तर त्यांनी सरळ कोर्टात जावं आणि माझ्यावर गुन्हा दाखल करावा. मला त्याबद्दल काहीही हरकत नाही. जे काही झाले, ते सर्व न्यायालयाच्या आदेशानुसारच झाले आहे.” तसेच, त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “समाज आणि महिलांचे संरक्षण करणे हे माझं कर्तव्य आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत ते करत राहीन. मात्र, या गोष्टीचा सध्याच्या खासदारांशी कधीच संबंध आलेला नाही, त्यामुळे त्यांच्या कडून कुठलीही अपेक्षा नाही.” या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं असून, मृत्यू झालेल्या भिक्षेकरूंना न्याय मिळावा आणि भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी योग्य चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

भिक्षेकरू मृत्यू प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू; सुजय विखेंचा लंकेंना प्रत्युत्तर Read More »

अजितदादा यांच्या उपस्थितीत जामखेडमध्ये रंगणार ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव

Ajit Pawar: हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जबरदस्त इतिहास, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दमदार प्रवास आणि समाजसुधारक महात्मा फुलेंच्या दिमाखदार कार्याचा पट उलगडणारा भव्य ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव जामखेडमध्ये रंगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या जयंतीचा त्रिवेणी मुहूर्त साधून येत्या 17 एप्रिलला संयुक्त जयंती महोत्सव आयोजित केला जाणार आहे. ज्येष्ठ गायक आनंदजी शिंदे यांचा ‘शिंदेशाही बाणा’ आणि अभिजीत जाधव, अमु जाधव यांचा ‘शिव शंभो गर्जना’ हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असेल. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या पुढाकारातून हा महोत्सव आयोजित केला आहे. जामखेड महाविद्यालयाच्या आवारात आयोजिलेल्या या महोत्सवाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होईल. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जेसाहेब यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती संध्या सोनवणे यांनी माध्यमांना दिली. 17 एप्रिल गुरुवारी सायंकाळी 6 वाजता अजित पवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार असून, त्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत शिंदे आणि जाधव यांच्या बहारदार गायनाची मैफल अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, असेही संध्या सोनवणे यांनी सांगितले. संध्या सोनवणे म्हणाल्या, ‘‘महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाजातील वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून, त्यांच्या आपुलकी वाढविण्यासाठी हा महोत्सव घेतला जातो. यंदाचे दुसरे वर्षे असून, त्यानिमित्त विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्र येणार आहेत. ’’ सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक प्रवाहात समता, बंधुभाव आणि न्यायाची मूल्ये टिकवणे ही काळाची गरज बनली आहे. शिवछत्रपतींचा पराक्रम, महात्मा फुल्यांचे क्रांतिकारक विचार, शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे धोरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक विचार यांचा वारसा अधिक ठामपणे पुढे नेण्याची गरज आहे. हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून ‘शिव-फुले-आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवा’चे आयोजन आहे, असे संध्या सोनवणे यांनी सांगितले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या माध्यमातून जामखेडमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार पहिल्यांदाच जामखेड येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात अजित पवार नेमके काय बोलणार, याकडे राजकीय वुर्तळाचे लक्ष राहणार आहे. त्यात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे उपस्थितीत राहणार असल्याची शक्यता आहे.

अजितदादा यांच्या उपस्थितीत जामखेडमध्ये रंगणार ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव Read More »

“बदनाम होतो… पण मंत्रालय मिळालं!” – बच्चू कडू यांची भावनिक कहाणी

Bacchu Kadu : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेच्या खेळी अनेक वेळा पटलावर बिनधास्तपणे रंगविल्या जातात. पक्षफोड, बंड, कुरघोडी, युती, फुटी या शब्दांनी आपल्या राजकारणाची पोत अखेरची काही वर्षं पूर्णपणे व्यापून टाकली आहेत. परंतु या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये एखादा नेता असा असतो, जो सत्तेसाठी नव्हे तर समाजासाठी बदनाम व्हायला तयार असतो. त्याचं नाव आहे बच्चू कडू. “मी बदनाम झालो, पण मंत्रालय मिळालं,” हे शब्द केवळ एका राजकीय खेळीचं समर्थन नाही, तर एका मनस्वी नेत्याच्या अंतर्मनातल्या भावनांचं प्रतिबिंब आहे. बच्चू कडू हे नाव आज केवळ एका राजकीय नेत्याचं नाही, तर शेकडो-हजारो दिव्यांगांच्या आशेचं केंद्र बनलं आहे. शिंदे गटाच्या बंडामध्ये सहभागी होणं ही त्यांची एक ‘राजकीय चूक’ होती, असं ते स्वतः मानतात. परंतु या चुकीच्या निर्णयातून एक मोठा लढा यशस्वी झाला दिव्यांग मंत्रालय मिळालं. हे मंत्रालय केवळ एका कुर्चीचं नाव नाही, तर अनेक अपंग, दिव्यांग बांधवांच्या आयुष्याला दिशा देणारा टप्पा ठरला. आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून हजारो गोरगरिबांच्या जीवनात प्रकाश टाकणं हेच बच्चूभाऊंचं अंतिम ध्येय होतं. “सत्तेसाठी नव्हे, आशीर्वादासाठी बंड” – ही ओळच त्यांच्या राजकीय भूमिकेची ओळख आहे. आज बच्चू कडू आमदार नाहीत. कदाचित मतदारांनी नाकारलं असेल किंवा ईव्हीएमने… पण दिव्यांगांसाठी आज जे निर्णय घेतले जात आहेत, जे धोरणं बनत आहेत, ती त्यांच्यामुळे. त्यामुळे ते आजही जनतेच्या मनात घर करून आहेत. आजच्या राजकारणात जेव्हा बहुतेकजण पदासाठी, ताकदीसाठी राजकीय बाजू बदलतात, तेव्हा बच्चूभाऊ कडू यांनी समाजासाठी आपली प्रतिमा खराब होऊ दिली – हे त्यांचं वेगळेपण अधोरेखित करतं. बच्चू कडू हे खऱ्या अर्थाने जनतेसाठी राजकारण करणारे नेते आहेत. त्यांची चूक त्यांनी मान्य केली, पण त्याच चुकांमधून काही लोकांच्या आयुष्यात बदल घडला – हीच त्यांची खरी ‘राजकीय विजय’ आहे. “बदनाम होणं चालेल, पण त्यातून जर गोरगरिबांच्या आयुष्यात उजेड पडत असेल, तर तो त्याग पत्करावा लागतो,” असं म्हणणारे बच्चू कडू आजच्या मतलबी राजकारणाला एक प्रश्न विचारतात – “तुम्ही किती लोकांसाठी बदनाम व्हायला तयार आहात?”

“बदनाम होतो… पण मंत्रालय मिळालं!” – बच्चू कडू यांची भावनिक कहाणी Read More »

ईव्हीएम हॅक करता येतं, निकालही फिरवता येतो; तुलसी गब्बार्ड यांचा खळबळजनक दावा

EVM Hack: अलीकडच्या काळात निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असताना अमेरिकेच्या माजी खासदार आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धक रहींल्या तुलसी गब्बार्ड यांनी एक खळबळजनक दावा करत जगाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) हॅक केल्या जाऊ शकतात आणि निवडणुकीचे निकाल मनमर्जीने फिरवले जाऊ शकतात. विशेष म्हणजे, त्यांनी असा दावा केला आहे की अमेरिकेच्या गुप्तचर विभागाकडे यासंदर्भात ठोस पुरावे आहेत. तुलसी गब्बार्ड यांचा हा आरोप निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. त्यांनी नमूद केलं की, अनेक देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम यंत्रणा डिजिटल स्वरूपाच्या असल्या तरी त्या शंभर टक्के सुरक्षित नाहीत. “या यंत्रांमध्ये एकतर दूरस्थ प्रवेशाचा धोका आहे किंवा आतूनच छेडछाड होण्याची शक्यता आहे,” असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार काय? तुलसी गब्बार्ड यांचे म्हणणे आहे की अमेरिकेच्या इंटेलिजन्स एजन्सीजकडे असे संकेत आहेत की काही देशांमध्ये निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप झाला आहे. त्या देशांमध्ये हॅकिंगद्वारे मतदानाच्या आकडेवारीत बदल घडवण्यात आला. हा हस्तक्षेप कितपत खोलवर गेला याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली, तरी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील संदर्भात चर्चा गरजेची भारतातही ईव्हीएम यंत्रांवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी या यंत्रणांवरील संशय व्यक्त केला आहे, मात्र निवडणूक आयोग सातत्याने या यंत्रांच्या विश्वासार्हतेचा पुनरुच्चार करत आला आहे. तुलसी गब्बार्ड यांच्या या वक्तव्यामुळे भारतीय राजकारणातही नव्याने चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे. लोकशाहीसाठी धोका की सुधारण्याची संधी? ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जाणं ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे. लोकांनी दिलेल्या मतांचा आदर राखणं आणि त्यांचं अचूक प्रतिबिंब निवडणुकीत उमटणं हे कोणत्याही लोकशाहीची खरी ताकद असते. त्यामुळेच या प्रकारच्या आरोपांची सखोल चौकशी होणं, यंत्रणांची पारदर्शकता वाढवणं, आणि जनतेला विश्वास देणं अत्यंत गरजेचं आहे. तंत्रज्ञानावर विश्वास ठेवायचा का? ईव्हीएम हॅक होऊ शकतात, हे जर खरं असेल, तर निवडणुकीच्या प्रक्रियेवरचं भिस्त असलेल्या लोकशाही व्यवस्थेला मोठा धोका आहे. मात्र, केवळ संशयाने निर्णय घेणंही योग्य ठरणार नाही. तंत्रज्ञान हे साधन आहे, हेतू नाही. त्यामुळे यंत्रणांची खातरजमा, आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य, आणि जनतेच्या विश्वासाची पुनर्स्थापना ही काळाची गरज बनली आहे.

ईव्हीएम हॅक करता येतं, निकालही फिरवता येतो; तुलसी गब्बार्ड यांचा खळबळजनक दावा Read More »