DNA मराठी

Pahalgam Attack Update

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला आदील कोण? हे राणेंनी सांगावे; रईस शेख यांचे प्रत्युत्तर

Rais Sheikh on Nitesh Rane : पहलगाम हल्ल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे मंत्री नितेश राणे यांनी या हल्ल्यानंतर धर्म विचारून दुकानातून वस्तू खरेदी करा असा सल्ला हिंदूंना दिल्याने त्यांच्यावर चारही बाजूने टीका होत आहे. तर दुसरीकडे आता समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पर्यटकांना वाचवताना मृत्युमुखी पडलेला आदील कोण होता? असा प्रश्न नितेश राणे यांना विचारला आहे. दुकानदाराला धर्म विचारून वस्तू खरेदी करा आणि त्याच्या धर्माविषयी संशय आल्यास हनुमान चालीसा म्हणायला लावा असं नितेश राणे यांनी एका सभेत बोलताना म्हटले आहे. तर आता राज्याचे मत्सव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे धार्मिक व्देष पसरवत आहेत. कश्मीरमध्ये पर्यटकांना वाचवताना अतिरेक्यांच्या गोळ्यांनी मृत्युमुखी पडलेला सय्यद आदील कोण होता, हे राणे यांनी सांगावे, असे आव्हान समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी दिले आहे. मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी, 26 एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील सभेत सदर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याला उत्तर देताना आमदार रईस शेख म्हणाले की, पहलगाम खोऱ्यात 22 एप्रिल रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी धर्म विचारुन पर्यटकांवर केलेला गोळीबार निंदनीय आहे. देशातील एकही मुसलमान अतिरेक्यांच्या या भ्याड हल्ल्याचे समर्थन करत नाही. याप्रकरणी पाकिस्तानविरोधात केलेल्या भारताच्या कृतीला मुसलमानांचा पाठिंबाच आहे. मात्र पर्यटकांना वाचवताना अतिरेक्यांशी दोन हात करताना मृत्युमुखी पडलेला सय्यद आदील हुसेन शहा हा स्थानिक मुस्लीम होता. 22 एप्रिलच्या हल्ल्यानंतर पर्यंटकांना स्थानिकांनी मोफत टॅक्सी, मोफत अन्न आणि मोफत निवासाची साेय उपलब्ध करुन दिली. हे सर्व स्थानिक मुस्लीम आहेत. जम्मू-कश्मीरच्या प्रत्येक मशिदीमध्ये, दर्ग्यामध्ये मयत पर्यटकांसाठी दुआ केली जात आहे. याविषयी मंत्री नितेश राणे का बोलत नाहीत, असा सवाल आमदार रईस शेख यांनी केला. ते पुढे म्हणाले, भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. पाकिस्तान प्रमाणे आम्ही धर्माच्या आधारावर देश चालवत नाही. त्यामुळे मंत्री नितेश राणे यांचे वक्तव्य तितकेच निंदनीय आहे. धर्माचे राजकारण करणे हा नितेश राणे यांचा धंदा बनला आहे. मांस खरेदी संदर्भातही राणे यांनी हलाल पद्धतीसंदर्भात केलेल्या वक्तव्याला कोणी गांभीर्याने घेतले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्र उभे करण्याचे काम करत असताना त्यांच्या भाजपचे मंत्री असलेले नितेश राणे देश तोडण्याचे काम करत आहेत, असा आरोप आमदार रईस शेख यांनी केला. बेताल धार्मिक वक्तव्य केल्याने कोणी धर्माचा कैवारी होत नसतो, नेता होत नसतो. भारतामध्ये धार्मिक राजकारणाला अजिबात थारा नाही. मंत्रीपदाची शपथ राणे हे विसरलेले आहेत. त्यांच्या अशा वक्तव्यांना त्यांच्या पक्षातूनही समर्थन नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची व्याख्याने मंत्री राणे यांनी मुळातून ऐकावीत, असा सल्ला आमदार रईस शेख यांनी दिला आहे.

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला आदील कोण? हे राणेंनी सांगावे; रईस शेख यांचे प्रत्युत्तर Read More »

शिवसेनेच्या वतीने जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटकांना आणण्यासाठी आतापर्यंत चार विमानांची सोय

Eknath Shinde: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः काश्मीरला जाऊन तेथे अडकलेल्या जास्तीत जास्त पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यानुसार आतापर्यंत 4 विमनामधून 520 पर्यटक मुंबईत परतले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील प्रवाशांना घेऊन काल मध्यरात्री 1 वाजता स्टार एअरलाईन्स या खाजगी कंपनीचे पहिले विमान मुंबईकडे झेपावले. यातून 75 पर्यटकाना मुंबईत आणण्यात आले. तर आज दुपारी दोन वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता श्रीनगरवरून निघालेल्या आकासा एअरच्या दोन विमानातून 370 पर्यटक मुंबईत परतले. हे विमान आज संध्याकाळी 7 वाजता तर दुसरे विमान अंदाजे 9 वाजता मुंबईत लँड झाले आहे. त्यातून परतलेल्या प्रवाशांना घरापर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने विशेष बसेसची सोय करण्यात आली आहे. याशिवाय आज रात्री 8 वाजता स्टार एअरलाईन्सचे अजून एक विमान मुंबईकडे झेपावले असून त्यातून अजून 75 प्रवासी रात्री उशीरा मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून 520 प्रवाशांना सुखरूप मुंबईत आणण्यात यश आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची टीम अद्यापही जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत असून जास्तीत जास्त पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

शिवसेनेच्या वतीने जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटकांना आणण्यासाठी आतापर्यंत चार विमानांची सोय Read More »

पहलगाम दहशतवादी हल्ला, भारताने तोडला सिंधू पाणी करार; पाकिस्तानवर काय होणार परिणाम?

Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत पाकिस्तानसोबत सुरू असणारा सिंधू पाणी करार तोडला आहे. सिंधू पाणी करार भारत आणि पाकिस्तानमध्ये 1960 मध्ये झाला होता ज्या अंतर्गत ज्याअंतर्गत सिंधू खोऱ्यातील सहा नद्यांचे पाणी – रावी, बियास, सतलज, सिंधू, झेलम आणि चिनाब – वाटण्यात आले होते. मात्र आता करारा भारताने तोडल्याने याचा पाकिस्तानवर मोठा परिणाम होणार आहे. सिंधू पाणी करार का स्थगित? जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ला पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ ने केला होता, जो लष्कर-ए-तैयबाचा एक भाग आहे. हल्ल्यानंतर, भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षेबाबत मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सिंधू पाणी कराराचा इतिहास 1960 मध्ये जागतिक बँकेच्या हमीसह सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी झाली. या करारानुसार, भारताला पूर्वेकडील नद्या – रावी, बियास आणि सतलज – मिळाल्या तर पाकिस्तानला पश्चिमेकडील नद्या – सिंधू, झेलम आणि चिनाब – मिळाल्या. दोन्ही देशांमधील पाणी वाद सोडवण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला होता आणि त्याला एक दुर्मिळ राजनैतिक सहकार्य म्हणून पाहिले जात होते. या करारानंतरही भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अनेक पटींनी वाढला, परंतु या कराराने कधीही पाण्याच्या वादांना युद्धाचे कारण बनू दिले नाही. पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा आता लगेच बंद होईल का? भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला असला तरी त्याचा पाकिस्तानवर तात्काळ परिणाम होणार नाही. सिंधू नदीचे पाणी वाचवण्यासाठी सध्या भारतात पुरेशा पायाभूत सुविधा नाहीत. तरीसुद्धा, या निर्णयाचा पाकिस्तानच्या शेती आणि जलविद्युत प्रकल्पांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सिंधू आणि तिच्या उपनद्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि या नद्यांमधील पाण्यातील कोणत्याही कपातीचा परिणाम पाकिस्तानच्या अन्नसुरक्षा आणि वीजपुरवठ्यावर होऊ शकतो. सिंधू पाणी करार स्थगित केल्याने पाकिस्तानवर काय परिणाम होईल? सिंधू पाणी करार स्थगित केल्याने पाकिस्तानचे कृषी आणि जलविद्युत प्रकल्प धोक्यात येऊ शकतात. पाकिस्तानच्या बहुतेक जलविद्युत संरचना आणि प्रमुख शहरे या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पाणीपुरवठ्यात कोणताही अडथळा आल्यास पाकिस्तानमध्ये अंधारकोठडीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. याशिवाय लाखो शेतकऱ्यांचे जीवनमानही धोक्यात येऊ शकते. पाकिस्तानकडे 90 दिवसांचा वेळ सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर भारताने पाकिस्तानला चर्चेसाठी 90 दिवसांची मुदत दिली आहे. तथापि, पाकिस्तानसाठी सर्वात मोठा प्रश्न हा असेल की तो दहशतवादाविरुद्ध ठोस कारवाई करेल का आणि भारतावरील दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करेल का. हे पाऊल पाकिस्तानसाठी महत्त्वाचे ठरेल, कारण त्याचा थेट परिणाम सिंधू पाणी करारावर होईल. भारताच्या या पावलामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा आपल्या भूमिकेवर विचार करण्यास भाग पाडले आहे. पाकिस्तान आता हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु भारताने स्पष्ट केले आहे की जर पाकिस्तान दहशतवादाबाबत गंभीर नसेल तर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते.

पहलगाम दहशतवादी हल्ला, भारताने तोडला सिंधू पाणी करार; पाकिस्तानवर काय होणार परिणाम? Read More »

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा व्हिडिओ पोस्ट करत रोहिणी खडसेंचा हल्लाबोल

Rohini Khadse: पहलगाम येथे झालेला अतिरेकी हल्ल्याबाबत काल संध्याकाळी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत संपन्न झाली. पण या हल्ल्याबाबत देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री यांनी अजून माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडली नाही अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मांडली आहे. प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी स्व. मनमोहनसिंग यांचा व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, काल परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची पत्रकार परिषद पाहताना एक गोष्ट जाणवली. पहलगाम येथे झालेला हल्ला हा कोणत्या धर्मावर झालेला हल्ला नसून आपल्या देशावर झालेला हल्ला आहे. या हल्ल्यात भारताचे अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत, इतका मोठा हा हल्ला होता. पण प्रसार माध्यमांशी बोलताना न देशाचे पंतप्रधान दिसले, न देशाचे गृहमंत्री दिसले अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अशा वेळी भारताचे माजी पंतप्रधान स्व.  मनमोहनसिंग यांची 26/11 हल्ल्याच्या वेळची पत्रकार परिषद आठवली असंही त्या म्हणाल्या.

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा व्हिडिओ पोस्ट करत रोहिणी खडसेंचा हल्लाबोल Read More »

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू

Pahalgam Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 6 महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला आहे . तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झालेत.

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू Read More »