सत्य लपवण्याचा ‘फेरफार’?
Sawedi land scam – प्रशासन जर चुकीच्या नोंदी करणाऱ्यांना वाचवत असेल, गोपनीय माहिती लीक होत असेल आणि बनावट कागदांवर स्वाक्षऱ्या केल्या जात असतील – तर या सगळ्याच्या मुळाशी असलेला जनतेचा प्रशासनावर असलेला विश्वासच उडतो होतो. ही बाब केवळ सावेडीपुरती मर्यादित नाही; ही एक सिस्टम फेल्युअर ची लक्षणं आहेत. Sawedi land scam – अहिल्सायानगर – सावेडी येथील सर्वे नं. २४५/ब२ मधील वादग्रस्त हाडाचा कारखाना आणि त्यासंबंधित फेरफार क्रमांक ७३१०७ प्रकरणात अखेर अहवाल सादर झाला, मात्र तो “फेरपुनरावलोकन” या शिफारसीपलीकडे फारसा पुढे गेलेला नाही. गेले काही महिने याबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप होत असताना प्रशासनाने केवळ पुनरावलोकनाची शिफारस करणे म्हणजे प्रकरण हलक्याफुलक्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न आहे, असे स्पष्टपणे म्हणावे लागेल. ही कारवाई म्हणजे ‘समस्या सोडवणे’ नव्हे तर ‘विलंब करा आणि विसरायला लावा’ अशा शैलीतील जुन्या धोरणाचे उदाहरण आहे. दस्तऐवज बनावट असल्याचे आरोप, खरेदीखत संदिग्ध असल्याचे पुरावे, आणि हस्ताक्षर बनावट असल्याचा स्पष्ट आरोप असूनही, ही बाब गंभीरपणे न घेता तिचा फेरपरीक्षण करून ‘नवीन पेपर तयार करून जुने पेपर’ झाकून टाकण्याचा प्रयत्न होत केला जात आहे. कारवाई होण्याऐवजी ‘जुळवून घेण्याची’ यंत्रणा सक्रिय? अहवाल अद्याप अधिकृतरित्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचलेला नसतानाही, त्यातील गोपनीय बाबी आधीच संबंधित गटांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः शहा गटाशी संबंधित काही व्यक्तींनी तत्काळ प्रांत कार्यालयात धाव घेतल्याचे चित्र दिसून आले. ही बाब केवळ संयोग नव्हे, तर प्रशासकीय यंत्रणेमधील ‘फुटलेल्या नळांची साखळी’ पुन्हा अधोरेखित करणारी आहे. याचा थेट अर्थ असा होतो की, अहवाल तयार होण्याच्या आधीच संबंधित व्यक्तींशी समन्वय साधला गेला असावा, आणि त्यांच्या ‘सोयीचा’ मजकूर त्यामध्ये उतरवण्यात आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार निष्पक्ष आणि पारदर्शक प्रशासनाच्या मूळ मूल्यांनाच सुरुंग लावणारा असून, यामुळे कारवाई होण्याऐवजी ‘जुळवून घेण्याची’ यंत्रणा सक्रिय आहे, हेच सिद्ध होते. चूक दुरुस्ती लेख – सत्य झाकणारा मुखवटा या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या “चूक दुरुस्ती लेखा”मध्ये मूळ सर्वे नंबर आणि क्षेत्रफळ कायम ठेवत नव्याने दुसरा सर्वे नंबर देण्यात आला, आणि त्यात क्षेत्रफळही वाढवण्यात आलं. हे करताना ज्या व्यक्तीची संमती घेतल्याचा दाखला आहे – त्याच व्यक्तीने “सही माझी नसल्याचा” दावा केला आहे. याहून गंभीर आणखी काय असू शकते? फक्त पुनरावलोकन पुरेसं नाही पुनरावलोकन म्हणजे एका चुकीच्या फाईलला दुसऱ्या फाईलने झाकणे. ही केवळ वेळकाढूपणाची कारवाई आहे. प्रशासकीय कागदोपत्री चुकांमागे नेहमीच एक हेतू असतो – आणि या प्रकरणात तो हेतू कोणाचा फायदा करण्यासाठी होता, हे तपासण्याची जबाबदारी महसूल विभागावर आहे. केवळ अहवाल लिहून आणि पुन्हा चौकशीचा सल्ला देऊन जबाबदारी झटकली जाणार असेल, तर यंत्रणेच्या अस्तित्वावरच प्रश्न उभा राहतो. लोकशाहीत विश्वास नसेल तर काय उरते? प्रशासन जर चुकीच्या नोंदी करणाऱ्यांना वाचवत असेल, गोपनीय माहिती लीक होत असेल आणि बनावट कागदांवर स्वाक्षऱ्या केल्या जात असतील – तर या सगळ्याच्या मुळाशी असलेला जनतेचा प्रशासनावर असलेला विश्वासच उडतो होतो. ही बाब केवळ सावेडीपुरती मर्यादित नाही; ही एक सिस्टम फेल्युअर ची लक्षणं आहेत. चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात… आता या अहवालावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांनी या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहून संबंधित दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली नाही, तर सावेडी हे प्रकरण इतर शहरातील जिल्हातील आणि इतर जिल्हातील भूमिगत भ्रष्ट व्यवस्थांना नवा आत्मविश्वास देईल. शेवटी एकच प्रश्न उरतो – फेरफाराचा अहवाल आला, पण न्याय कुठे आहे?
सत्य लपवण्याचा ‘फेरफार’? Read More »
