IND vs PAK: Champions Trophy 2025 साठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? आयसीसीने घेतला मोठा निर्णय
IND vs PAK: आयसीसीकडून 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. मात्र या स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत अद्याप बीसीसीआयकडून निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आशिया चषक 2023 प्रमाणे हायब्रीड मॉडेल अंतर्गत चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करू शकते असे वृत्त समोर येत आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी श्रीलंका किंवा आशिया चषकाप्रमाणे इतर कोणत्याही देशाचा दौरा करावा लागणार आहे. यासाठी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) देखील तयार असून त्यासाठी बजेटही तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे. त्याची तयारी पाकिस्तानात सुरू आहे. सर्व अंदाज लक्षात घेऊन आयसीसीने 544 कोटी रुपयांचा प्लॅन बी तयार केला आहे. मात्र, आयसीसीने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. एका अहवालानुसार, ICC ने कोलंबो येथील वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) $65 दशलक्ष (म्हणजे 544 कोटी रुपये) पेक्षा जास्त बजेट मंजूर केले आहे. हायब्रीड मॉडेलची शक्यता वाढली वृत्तानुसार, या स्पर्धेसाठी पीसीबीला मिळालेल्या रकमेमध्ये भारताने या स्पर्धेसाठी पाकिस्तानला न गेल्यास होणारा खर्च देखील समाविष्ट आहे. याचा अर्थ, पीसीबीला इतका पैसा मिळाला आहे की ते भारताचे सामने पाकिस्तानबाहेर वेगळ्या ठिकाणी आयोजित करू शकतात. अशा स्थितीत ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर होण्याची शक्यता बळावली आहे. लाहोरमध्ये सामने होणार आहेत वेळापत्रकानुसार, भारताचे सामने लाहोरमध्ये होणार आहेत, ज्यामध्ये भारत-पाकिस्तान सामना शनिवार, 1 मार्च रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त बांगलादेश आणि न्यूझीलंड अ गटात आहेत. ब गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असणार असल्याची माहिती समोर आली आहे.